सातारा दि. 23 : कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 496 कुटुंबातील 1 लाख 83 हजार 21 जणांची तपासणी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येत असून या माहिमेचा पहिला टप्पा 17 सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबांना पथक भेट देणार आहे.
या मोहिमेंतर्गत तालुकानिहाय तपासणी करण्यात आलेल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे (कुटुंबांची संख्या आहे ). जावली – 6077 (1742), कराड – 2781 (1971), खंडाळा-42464 (10211), खटाव – 22470 (4538), कोरेगांव – 12600 (2580), महाबळेश्वर – 2716 (2249), माण – 2657 (2657), पाटण- 19266 (19143), फलटण 47412 (10973), सातारा – 15337 (3524) व वाई 9241 (2908).
या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कामॉर्बिड रुग्ण आहेत का याची माती घेणार आहेत. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 च्या तपासणीसाठी स्वॅब चाचणी करुन पुढील उपचार केले जातील. नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवयक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.