महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :मायणी
मायणी ता. खटाव येथील ग्राहक संघाच्या रास्त धान्य दुकान चालकाची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होण्यास दिरंगाई होत असल्याने दिनांक २ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी येथील चांदणी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन जनता क्रांती दलाचे पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष विकास सकट यांनी तहसीलदार खटाव यांना दिलेले आहे .
या संदर्भात निवेदनात दिलेली माहिती अशी – येथील ग्राहक संघाचा रेशनिंग दुकानदार चालक याची चौकशी करण्या संदर्भात जनता दल संघटनेच्यावतीने यापूर्वी दिनांक २१ रोजी तहसीलदारांना निवेदन दिले गेले होते. यानंतर मध्ये तीन चार दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाकडून दुकानदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आल्याची हालचाल दिसली नाही. उलटपक्षी चालकास वेळ देऊन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्या सुधारण्यासाठी वेळ दिला गेला आहे .त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या दुकान चालकास अप्रत्यक्षरीत्या मदत केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे .सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या तोंडचा घास कोविडच्या गंभीर परिस्थितीत दुकान चालकाने पळविला आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य माणूस उपाशी झोपणार नाही यासाठी प्रयत्न केले. पण ग्रामीण स्तरावरती रेशनिंगमध्ये कमी वाटप करून घोटाळा करून स्वतःचे बँक बॅलन्स वाढवण्यात दुकानचालक मग्न आहे. त्यांना थोडीशी सुद्धा उपाशी झोपणाऱ्यांची कीव येत नाही ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे.
योग्य वेळी योग्य दिवशी धान्य वाटप न झाल्याने बऱ्याच कुटुंबांना उपासमारीशी झुंज द्यावी लागत आहे. महिन्याच्या पंधरा ते वीस तारखे नंतर सदर दुकान चालक दुकान उघडत असतो. त्यामुळे अनेक कुटुंबातील लहान मुलांना कुपोषणा सारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच वेळा सदर दुकानातून धान्य साठा गैरमार्गाने वाहतूक होताना अनेक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला आहे. मात्र भांडवलदारांच्या विरोधात जाणार कोण? त्यामुळे कोणीही तक्रार देण्यास धजवत नाही अथवा तक्रार केलीच तर प्रशासन याची दखल घेईलच याची खात्री वाटत नाही. सदर दुकान चालकाचे कामकाज गैर व गंभीर स्वरूपाचे असल्याने संबंधित दुकान चालकावरती तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी दि. 2 ऑक्टोबर रोजी मायणी येथील चांदणी चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आहे.