महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड:
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 सालातील 47 व्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याचे चेअरमन, राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या सर्व विद्यमान संचालकांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 19 ऑक्टोंबर, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
आबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कामकाज काटकसरीने आणि नियोजनबद्द पद्धतीने सुरू आहे, नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची पूर्व तयारी करण्यात आलेली असून, बैलगाड्या, ट्रॅक्टर गाड्या, ट्रक, ट्रॅक्टर यांचेशी करार करण्यात आलेले आहेत. कारखान्याच्या मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे पुर्णत्वास आली आहेत. ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक श्री आबासाहेब पाटील यांनी केले आहे.