महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार नगरपालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यानुसार कराड नगरपालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा रविवारी सायंकाळी पालिकेत प्रसिद्ध करण्यात आला. द्विसदस्यीय प्रभागांनुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. शहरात दोन सदस्यांचे 14 तर तीन सदस्यांचा एक प्रभाग आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे दरम्यान हरकती दाखल करायच्या आहेत. 23 मे रोजी यावर सुनावणी देण्यात येणार आहे. 30 मे पर्यंत जिल्हाधिकारी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने आपला अहवाल निवडणूक आयुक्तांना सादर करतील. 6 जूनपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येणार असून 7 जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेबाबत फारशा तक्रारी नाहीत असे समजते त्यामुळे हरकती दाखल होण्याची शक्यता जवळजवळ नाहीये.