कोरेगाव : सातारा तालुक्यातून मोटारसायकल चोरणार्या दोघांचा छडा लावण्यात कोरेगाव पोलिसांना यश आले आहे. चोरीची मोटारसायकल घेऊन पळणार्या महेश बबन झांजुर्णे, वय २५, रा. तडवळे संमत कोरेगाव व मयुर अनिल घोडके वय २९, रा. सुभाषनगर-कोरेगाव यांना शिताफीने अटक केली. त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली आहे.
जिल्ह्यात मोटार सायकलसह चार चाकी वाहनांच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस कर्मचार्यांना रात्रीबरोबरच दिवसा गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे, कर्मचारी किशोर भोसले, अजित पिंगळे, प्रशांत लोहार व साहिल झारी हे शनिवारी कुमठे फाटा परिसरात गस्त घालत असताना दोन जण एका मोटारसायकलवरुन भरधाव येत असल्याचे दिसले. ते संशयित वाटत असल्याने दोघांनी त्यांना अडविले आणि मोटारसायकलची कागदपत्रे मागितली, मात्र त्यांना कोणतीही माहिती देता आली नाही. त्यांचे नाव विचारले असता, महेश बबन झांजुर्णे, वय २५, रा. तडवळे संमत कोरेगाव व मयुर अनिल घोडके वय २९, रा. सुभाषनगर-कोरेगाव असे सांगितले. त्यांच्याकडे असलेली हिरो होंडा पॅशन मोटारसायकल क्र. एम. एच. ११-सी. एफ.-२३५० ताब्यात घेतली. दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांनी सातारा तालुक्यातून ती चोरुन आणली असल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार केशव फरांदे तपास करत आहेत.
कोरेगाव पोलिसांच्या धडक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी त्यांचे अभिनंदन केले.