पाटण : नागोजीराव पाटणकर वाचनालयाच्या उत्कृष्ठ नियोजन आणि व्यवस्थापनामुळे वाचकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाचनाशिवाय पर्यायही नाही आणि आपली सर्वांगीण प्रगतीही शक्य नाही. त्यामुळे युवकांनी वाचनालयातील विविध पुस्तकांचे वाचन करून आपल्या ज्ञानात भर टाकावी. पुस्तक म्हणजे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत. आजच्या सोशल मिडीयाच्या युगात वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष होत असले तरी आपण सर्वांनी मिळून योगदान देवून वाचनालय चळवळ पुढे नेवूयात, असा विश्वास सकस ग्रीन व्हॅली फूड प्रोसेसर्स प्रा. लि. पाटणचे जनरल मॅनेजर राजेंद्र कदम यांनी केले.
येथील श्रीमंत नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालयात दीपावली निमित्ताने आयोजित केलेल्या दिवाळी अंक तसेच नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर, सौ. शीलादेवी पाटणकर, दीपकसिंह पाटणकर, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजय कवडे, वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार निकम, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सेक्रेटरी प्रदीप साळवेकर, ग्रंथपाल संजय इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ग्रंथपाल संजय इंगवले म्हणाले, शंभर वर्षांची दिवाळी अंकाची परंपरा असून यावर्षी दर्जेदार दिवाळी अंक खरेदी केले आहेत. दिवाळी अंकामुळे समाजातील अंतरंग कळतात. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. वाचनसंस्कृती टिकावी, समाजाचे संवर्धन, समाज विकास हा वाचनानेच होत आहे. मात्र अलिकडे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. माणसाच्या जीवनाला आकार देण्याचे काम ज्ञानाच्या माध्यमातून ग्रंथच करू शकतात. अनेक महापुरूष हे ग्रंथांमुळेच घडले. ज्यांनी ज्यांनी ग्रंथांना जवळ केले, त्यांचे वाचन केले ती माणसे समाजात प्रगल्भ झालेली आहेत. काळ कितीही पुढे जावो, इंटरनेट, सोशलमिडीयाचे माध्यम किती पुढे आले तरी ग्रंथांच्या माध्यमाून वाचनसंस्कृती घडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार निकम म्हणाले, प्रत्येकवर्षी आमचे ग्रंथालय वाचकांसाठी नाविन्यपूर्ण पुस्तके, ग्रंथ खरेदी करत असतो जेणे करून लोकांनी ती वाचावीत. पुस्तक वाचले तरच आपण वाचणार आहोत. सोेशल मिडीयाद्वारे, इंटरनेटद्वारे तुम्ही पुस्तके वाचू शकता मात्र त्या पुस्तकांना स्पर्श करू शकत नाही. पुस्तकांची जागा कोणी घेवू शकत नाही. आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी पुस्तके, ग्रंथांशिवाय पर्याय नाही. दिवाळी अंकही उपलब्ध करून दिले आहेत. वाचनालयातील पुस्तके, ग्रंथांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रंथपाल संजय इंगवले यांनी सुत्रसंचालन केले. वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार निकम यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सेक्रेटरी प्रदीप साळवेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. बी. एन. पाटील, प्राचार्य एस. डी. पवार, ऍड. सौरभ देशपांडे, डी. एन. संकपाळ, रोटरीचे अध्यक्ष सतीश रणदिवे, प्रा. एन. जी. वाले, मुख्याध्यापक व्ही. जी. पवार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, आबासाहेब भोळे, बाळासाहेब कुंभार, मोहनराव पाटील, दिनकरराव देसाई आदींसह वाचनालयाचे संचालक, वाचक, ग्रंथप्रेमी नागरिक उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रंथपाल संजय इंगवले, दत्तात्रय कवडे, श्रीमती मनिषा फुटाणे, सौ.मनिषा कुंभार यांनी परिश्रम घेतले.



















