नियोजन व शिक्षणच्या सभापतीपदी चांदे, तर महिला व बालकल्याण च्या सभापतीपदी शिंगण
महाराष्ट्र न्यूज मलकापूर प्रतिनिधी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीत येथील पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी पार पडल्या. नियोजन व शिक्षण सभापतीपदी प्रशांत चांदे, तर महिला व बालकल्याण शकुंतला शिंगण यांची सभापतीपदी निवड झाली.या दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. तर पाणीपुरवठा स्वच्छता व जलनी:स्सारण सभापतिपदी मनोहर शिंदे व बांधकाम सभापतिपदी राजेंद्र यादव यांची पुन्हा वर्णी लागली.शहरातून पुणे-बंगळूर आशियाई महामार्ग गेला असल्याने शहराचे पूर्व-पश्चिम दोन भागात विभाजन झालेले आहे. पूर्वेला दोन सभापतिपदे व पश्चिमेला दोन सभापतिपदे देण्यात आली आहेत.
तर एक नवीन चेहरा पूर्वेला तर एक पश्चिमेला देऊन भौगोलिक समतोल साधला आहे. त्यामध्ये पालिकेचे उपाध्यक्ष श्री. शिंदे आणि नवीन संधी मिळालेले श्री.चांदे हे पूर्वेला, तर श्री यादव व सौ शिंगण यांना पश्चिम भागात संधी देण्यात आली आहे. श्री चांदे यांचे चुलते शंकर चांदे यांनीही यापूर्वी बांधकाम व नियोजन शिक्षण सभापती पदाची धुरा सांभाळली होती. श्री चांदे यांनी पहिल्याच निवडणुकीत यश मिळवून नियोजन, शिक्षण सभापती पद मिळवले आहे. यापूर्वी या पदावर (कै.) दत्ता पवार यांनी काम पाहिले होते.
शकुंतला शिंगण यांनीही पहिल्यांदाच निवडणुकीत यश मिळवून महिला व बालकल्याण सभापती पद मिळवले.यापूर्वी या पदावर आनंदी शिंदे तर उपसभापती पदी कमल कुराडे यांनी काम पाहिले होते.पाणीपुरवठा, स्वच्छता व जलनी:स्सारण समितीच्या सदस्यपदी भाजपचे नगरसेवक दिनेश रैनाक, बांधकाम समितीच्या सदस्यपदी नुरजहाँ मुल्ला, नियोजन व शिक्षण समितीच्या सदस्यपदी निर्मला काशीद, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी भास्कर सोळवंडे यांची निवड करण्यात आले आहे या निवडीने राजकीय समतोल ही साध्या चे चित्र आहे.
































