कराड : प्रतिनिधी सातारा तालुक्यातील डोळेगाव ते पाडळी ग्रा.मा. 225 या रस्ताच्या दुरुस्ती कामासाठी 11.82 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने रस्ता दुरूस्तीची अनेक दिवसापासूनची नागरिकांची मागणी आता पूर्ण होणार आहे. डोळेगाव ते पाडळी हा ग्रामीण मार्ग दळणवळणासाठी फारच खराब झाला आहे. त्यामुळे डोळेगाव, मांडवे, पाडळी, निनाम येथील ग्रामस्थांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्यासाठी विभागातील ग्रामपंचायतींच्या पदाधिका-यांनी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाव्दारे मागणी केली होती. गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि यावर्षी पडलेल्या प्रचंड पावसाने रस्त्यावर मोठ-मोठे खडडे पडले आहेत. या रस्त्यावरून अनेक समस्यांना तोंड देत प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता सातारा शहराकडे जाणारा सर्वात नजिकचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरुन मांडवे, निनाम, पाडळी, डोळेगाव, वेचले आदी गावातून पुढे राष्ट्रीय महामार्गाकडे शेंद्रे येथे तसेच सातारा दिशेला जाता येते. सोयीचा रस्ता असल्याने सदर गावातील नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता होणे फार महत्वाचे आहे. मांडवे ते डोळेगाव या रस्त्याची दुरुस्ती झाल्यास अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक सुलभ होणार आहे. तर या भागासह मांडव्यापासून डोळेगाव पर्यंत दोन्ही बाजूने दळणवळण विना अडथळ्याचे सोयीचे होण्यास मिळणार आहे. सदर कामासाठी खा. श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील होते. अतिवृष्टी व पूरपरिस्थिती करावयाच्या उपाययोजना या शीर्षाखाली सा.क्रं.0/000 ते 3/000 डांबरीकरण करणे, तसेच खडडे बुजवणे ही कामे घेण्यात येणार असून पदवधीर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची आचारसंहिता संपलेनंतर या कामाचा कार्यारंभ आदेश होईल असे बांधकाम विभाग (उत्तर) यांनी खा. श्रीनिवास पाटील याना पत्राव्दारे कळविले आहे. दरम्यान पाडळीचे माजी सरपंच दिलीप ढाणे, डॉ. हणमंत ढाणे, गजानन ढाणे, प्राचार्य बाबुराव दळवी, दत्तात्रय कुंभार, निनामचे सरपंच जीवन जाधव, बाबुराव महाडीक, विजय महाडिक, मांडवेचे संजय पवार, सरपंच राजेंद्र माने, भैरवगडचे सरपंच लक्ष्मण साळुंखे व ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व खा. श्रीनिवास पाटील यांचे या मंजूर कामाबद्दल आभार मानले आहेत.