कोरेगावसह खटाव-माण तालुक्यातील तस्करांचा पर्दाफाश
कोरेगाव : कोरेगाव पोलीस ठाण्याची सुत्रे हाती घेतलेल्या आयपीएस अधिकारी रितू खोखर यांनी अवैध धंदे करणार्यांचा पूर्णत: बिमोड करण्याचा निर्धार केला असून, शुक्रवारी त्यांनी गांजाची विक्री करणार्या टोळीचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. कोरेगावसह खटाव-माण तालुक्यात या गांजा तस्करीचे जाळे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रितू खोखर यांनी कामकाजामध्ये आमुलाग्र बदल केले आहेत. त्यांनी स्वत:चे असे खबर्यांचे नेटवर्क तयार केले असून, अवैध धंदे करणार्यांवर कठोर कारवाईचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६. ४५ च्या सुमारास त्यांना कोरेगाव तालुक्यात चिमणगाव येथे गांजा वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे, हवालदार केशव फरांदे, विजय जाधव, पोलीस नाईक मिलिंद कुंभार, अमोल सपकाळ, किशोर भोसले यांच्यासह कर्मचारी प्रशांत लोहार, अजित पिंगळे, साहिल झारी, शीतल रासकर व पूनम वाघ यांचे पथक तयार करुन सापळा रचला.
दरम्यानच्या काळात होंडा ऍक्टिव्हा दुचाकी क्र. एम. एच. ११-बी. वाय.-३०९१ वरुन दोन जण संशयितरित्या प्रवास करत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, दोघांना ताब्यात घेतले. हसिम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने या दोघांकडून ४ किलो १८५ ग्रॅम वजन असलेला गांजा जप्त केला. त्यांच्याकडील मोबाईल हँडसेटसह एकूण ७७ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी अनोळखी व्यक्तीकडून गांजा विकत घेत असल्याची माहिती दिली, त्यांची नावे माहीत नसली तरी घरे माहित असल्याचे सांगितले.
त्यानंतर खोखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दहिवडी येथील बाजार पटांगणाजवळ वास्तव्यास असलेल्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांनी गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली असून, त्यांच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्याकडून ६३ हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल सपकाळ यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जणांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आयपीएस अधिकारी रितू खोखर तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी आयपीएस अधिकारी रितू खोखर यांच्यासह पथकाचे अभिनंदन केले.