पाटण, दि. 27 : बहुचर्चित पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अजय श्रीरंग कवडे यांची व उपनगराध्यक्षपदी विजय उर्फ बापू टोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.
दीड वर्षापूर्वी झालेल्या पदाधिकारी निवडीत येथे नगराध्यक्ष पदासाठी संजय चव्हाण व उपनगराध्यक्ष पदासाठी सचिन कुंभार यांना सव्वा वर्षांसाठी व त्यानंतर नवीन नगरसेवकांना संधी देण्याचे ठरविण्यात आले होते. सव्वा वर्षानंतर पूर्ण झालेल्या कालावधी दरम्यान कोरोना महामारीमुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान नुकताच या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अजय कवडे यांचाच सोमवारी एकमेव अर्ज दाखल झाला होता. तर उपनगराध्यक्षपदासाठीही शुक्रवारी रामापूर परिसरातून नगरसेवक विजय उर्फ बापू टोळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. या दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी अजय कवडे व उपनगराध्यक्षपदी विजय उर्फ बापू टोळे यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या.