पाटण,
: ठोमसे, ता. पाटण येथील जोतिर्लिंग मंदिरात नाग जातीच्या सापाला पकडून पिंडीवर ठेवल्याप्रकरणी मंदिराचा पुजारी गुरूनाथ गुरव (रा. ताईचीवाडी, शिरळ, ता. पाटण) याला पाटणच्या वनविभागाने रंगेहाथ पकडून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये वनगुन्हा दाखल केला आहे. पकडलेल्या नाग जातीच्या सापाला अज्ञानस्थळी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, ठोमसेतील अंधश्रध्देचा खुद्द वनविभागाकडून पर्दाफाश करण्यात आल्याने यापुढील अशा घटनांना निश्चित आळा बसेल.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार दि. 26 रोजी पाटण वन परीक्षेत्रातील मौजे ठोमसे या गावात जोतिर्लिंग मंदिरात नाग जातीचा साप पकडून पिंडीवर ठेवला होता. अनेक भाविक याठिकाणी दर्शनाला जात आहेत अशी माहिती वनविभागाला मिळताच पाटण तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मल्हारपेठचे वनपाल संजय भाट व वनरक्षक रोहित गुरव, चाफळचे वनरक्षक विलास वाघमारे, वनसेवक महादेव कदम यांनी घटनास्थळी जावून सर्पमित्र विकास पानस्कर यांच्या मदतीने गुलाल टाकलेल्या नाग जातीच्या सापाची मंदिरातून सोडवणूक केली. तसेच सापाची तपासणी केली असता त्याचे दात काढलेले आढळून आले. त्यानुसार पुजारी गुरूनाथ यशवंत गुरव (रा. ताईचीवाडी, शिरळ, ता. पाटण) याच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये वनगुन्हा नोंदविला आहे.
अधिक चौकशी केली असता मंदिराचा पुजारी गुरूनाथ गुरव याने मौजे ठोमसे येथील रहिवाशी तानाजी पांडूरंग साळुंखे यांना तुमच्या घरासमोरील जोतिर्लिंग मंदिरात बुधवार दि. 25 रोजी पिंडीवर भुजंग प्रकट होणार आहे असे सांगितले. त्यानुसार त्यांना पुजेचे व आरतीचे साहित्य आणण्यास सांगून मंदिरासमोर रांगोळ्या व फुले टाकण्यास सांगितले. त्यानुसार गुरूनाथ गुरव याने पकडून आणलेला नाग रात्री 9.30 वाजता कोणालाही माहित न होता तो पिंडीवर ठेवला होता. तसेच कोणालाही दंश करू नये यासाठी सापाचे दातही काढण्यात आले असल्याचे आढळून आले. त्यानुसार सदर व्यक्तीव गुन्हा दाखल करण्यात येवून अटकही करण्यात आली आहे.