जागतिक दिव्यांग दिनी नगरपंचायत व सोनेरी ग्रुपच्या वतीने कृतज्ञता गौरव
महाराष्ट्र न्यूज कोरेगाव प्रतिनिधी : कोणताही घटक शासनाच्या योजनेपासून वंचित न राहता समाजातील प्रत्येक उपेक्षित, गरजूंना कोरेगाव नगरपंचायतीचे पाठबळ राहिल असा विश्वास मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी व्यक्त केला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज कोरेगाव नगरपंचायत व सोनेरी ग्रुप या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला, त्यावेळी विजया घाडगे बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्षा मंदा बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, किशोर बर्गे, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, राजेश बर्गे, अजित बर्गे, धनंजय भुजबळ, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक प्रताप खरात, धनंजय पंडित, दीपक भुजबळ आदी उपस्थित होते.
मुख्याधिकारी घाडगे पुढे म्हणाल्या, शासनाच्या ज्या योजना दिव्यांगासाठी असतात त्या सत्वर देण्याचा आमचा प्रयत्न राहील, कोणत्याही अडचणींच्यावेळी नगरपंचायत पाठिशी उभी राहील असा विश्वासही त्यांनी दिला.
यावेळी शहरातील दिव्यांग व्यक्तिंना सोनेरी ग्रुपच्या वतीने आरोग्य साहित्य व खाऊ देण्यात आला.
या आगळ्यावेगळ्या कृतज्ञता गौरवाबद्दल सर्व दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटूंबियांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास नगरपंचायत कर्मचारी, सोनेरी ग्रुपचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.