कोरेगाव : कोरेगाव शहरानजिक असलेल्या गोळेवाडी व जाधववस्ती (एकंबे रस्ता) येथून ८२ हजार रुपये किंमतीच्या ११ शेळ्या व २०० कोंबड्या चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी यंत्रणा गतिमान करत अवघ्या २४ तासामध्ये संशयितांची धरपकड करत गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ जीप जप्त करण्यात आली आहे.
एकंबे रस्त्यावर असलेल्या जाधववस्तीवरील रोहन राजेश जाधव यांच्या शेडमध्ये असलेल्या ३० हजार रुपये किंमतीच्या ११ शेळ्या अज्ञात चोरट्याने शनिवारी रात्री चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गार्ंभीय लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे, हवालदार प्रमोद चव्हाण, किशोर भोसले व साहिल झारी यांना तपासकामी सूचना दिल्या होत्या.
पोलीस पथकाने खबर्यांचे नेटवर्क उभे करत माहिती घेतली असता सायगाव (एकंबे) येथील बाबु रमेश जाधव याने व त्याच्या सहकार्यांनी शेळ्या चोरुन नेल्या असून, त्या विकण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने हालचाली करुन बाबु रमेश जाधव वय २५, याच्यासह दत्तात्रय हिंदुराव साळुंखे वय ४०, रा. विसापूर, ता. खटाव आणि दादा हणमंत जाधव वय ३६, रा. गाववाडी (विसापूर), ता. खटाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. एम. एच. ११-बी. एच. ६५२७ जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर गोळेवाडी, ता. कोरेगाव येथील एका पोल्ट्रीफार्ममधून ५२ हजार रुपये किंमतीच्या २०० कोंबड्या चोरल्या असल्याची कबुली तिघांनी दिली.
कोरेगाव पोलिसांच्या धडक कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे, हवालदार प्रमोद चव्हाण,सनी आवटे, किशोर भोसले व साहिल झारी यांचे अभिनंदन केले.































