सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी…
यवत ता.दौंड जि. पुणे येथील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढणं आणि त्यासाठी छोटे-मोठे उपक्रम सातत्यानं घेणं , हे भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असून त्याचाच प्रत्यय शासकीय कागदपत्रं उपलब्ध होण्यासाठीच्या आजच्या शिबिरातून येतो “, अशा आशयाचे प्रशंसोद्गार मंडल अधिकारी महेश गायकवाड ह्यांनी काढले. ते येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठीच्या शिबिराच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते.अजून एक मंडल अधिकारी व्ही.एस.धांडोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सहसचिव सूर्यकांतकाका खैरे आणि संचालक अरुण थोरात ह्यांची ह्या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर हे होते.
प्रारंभी महाविद्यालयाचे सा.प्रा.धनंजय भिसे ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, सूर्यकांतकाका खैरे ह्यांनी शिबिर आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.शेवटी सा.प्रा.प्रियांका कुऱ्हाडे ह्यांनी आभारप्रदर्शन केले.सूत्रसंचालन सा.प्रा.दीप्ती सातव ह्यांनी केले.महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत असलेल्या एस.सी.,एस.टी.,ओ.बी.सी.ॲंड मायनॉरिटी सेलने ह्या शिबिराचे आयोजन केले होते.ह्या शिबिराचा लाभ भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे २९ विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे ८७ विद्यार्थी अशा एकूण ११६ विद्यार्थ्यांनी घेतला.दौंड तालुक्याचे तहसीलदार संजय पाटील ह्यांच्या आदेशानुसार २ मंडल अधिकारी, १० तलाठी , २ कोतवाल आणि महा ई-सेवा केंद्राचे २ संचालक अशा सर्वांचे सदर शिबिराला सहकार्य मिळाले. कोरोनाविषयक सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन ह्या शिबिराप्रसंगी करण्यात आले.






















