महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कराडमध्ये विजय दिवस समारोह अत्यंत साध्या पद्धतीने व गर्दी न करता जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
प्रथमता: मान्यवरांनी प्रीतीसंगमावरील देशाचे पहिले उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर विजय दिवस चौकातील विजय स्तंभास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विजय दिवस समिती प्रमुख कर्नल संभाजी पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिनी शिंदे, कराड नगरपरिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके, गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक विनायक विभुते, नगरसेविका विद्या पावसकर, जनशक्ती आघाडीचे अरुण जाधव, विविध पक्षाचे पदाधिकारी, मेजर, व कराड नगरीतील नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या चळवळीतील कर्नल संभाजीराव कणसे पाटील यांच्या कल्पनेतून व कराड नगरीतील नागरिक तसेच कराड नगरपालिका यांच्या विशेष सहकार्यातून १९९७ पासून विजय दिवसाची सुरुवात कराड नगरीत झाली. १४,१५,१६ हे तीन दिवस प्रामुख्याने कराड नगरी तील नागरिकांच्या आयुष्यातील आनंदाचे दिवस असतात. या दिवशी शस्त्र, रणगाडे, एअर शो, सैनिकांच्या कवायती, मल्लखांब, लेझीम असे डोळ्याचे पारणे फेडणारे कार्यक्रम पहावयास मिळतात. या ठिकाणी फक्त कराड शहरातीलच नव्हे तर तालुका, जिल्हा, राज्यातून लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटतात व भारावून जातात.
मात्र यावर्षी कोरोना सारखे महाभयंकर संकट देशावर आले.
त्याचा सामना अजून सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षी विजय दिवस समारोह कराड नगरीत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे, या वर्षी विजय दिवस समारोह अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले की १९७१ साली भारताच्या पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांनी बांगलादेशमध्ये मुक्तीवाहिनी म्हणजे तेथील सैनिकांना व नागरिकांना गनिमी काव्याचे शिक्षण देऊन व छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मुठभर सैन्य घेऊन मुघलांना रोखलं,अशी धोरण राबवून भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले.
एक ईस्ट पाकिस्तान म्हणजे बांगलादेश व वेस्ट पाकिस्तान म्हणजे आत्ताच पाकिस्तान यांचे बळ कमी करण्याकरता, माजुरी कमी करण्याकरता इंदिरा गांधींनी केलेला प्रयत्नास यश आल्याने विजय दिवस साजरा करण्यात येतो. त्याचा आज ४९ वाढदिवस आहे.५० व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार जल्लोषाने करणारा विजय दिवस समारोह आज आपण साध्या पद्धतीने साजरा करत आहोत. मात्र पुढच्या वर्षी ५० वा विजय दिवस वाढदिवस आपण जल्लोषात साजरा करू असे ते म्हणाले.