महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ सातारा : गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारचे नूतन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना केंद्र शासनाचे असाधारण आसूचना कुशलता पदक तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
अजय कुमार बन्सल यांनी दि. 13 ऑगस्ट 2018 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक अभियान पदाचा गडचिरोली येथे कार्यभार स्वीकारला. त्यांनी तेथील दुर्गम, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा विश्वास संपादन करून खबर्यांचे जाळे निर्माण केले. त्यांच्या या पुढाकारामुळे त्यांना संपूर्ण गडचिरोली तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून गोपनीय माहिती प्राप्त होण्यास सुरुवात झाली. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा गड असलेला अबूझमाड जंगल भागात पोलीस खबरी यंत्रणा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. या सर्व बाबींचे सकारात्मक परिणाम दिसून आले. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल संवेदनशील भागात तसेच छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षलविरोधी मोहिमा यशस्वीरित्या राबवता आल्या. त्यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना दि.23 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय गृह विभागातर्फे असाधारण असूचना कुशलता पदक जाहीर केले आहे. त्यांच्यासह महाराष्ट्रातील एकूण सात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हे पदक जाहीर झाले आहे.
दरम्यान, गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात सलग दोन वर्षे सेवा बजावून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि. 30 डिसेंबर रोजी त्यांना महाराष्ट्र शासनाने विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. दि. 1 मे 2020 रोजी त्यांना मुंबई पोलीस महासंचालक यांचे पोलिस महासंचालक पदक देखील प्राप्त झाले आहे.