महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मसूर :
शहापूर, ता. कराड येथील 536 ए.एस.सी. बटालियन ग्वाल्हेर येथे कार्यरत असलेले जवान कृष्णत दिलीप कांबळे (वय 39) यांच्या निधनाने शहापूर परिसर हळहळला. त्यांना हजारो लोकांनी मानवंदना देवून अखेरचा निरोप दिला.
शुक्रवारी, दुपारी 4 वाजता जवान कृष्णत कांबळे यांचे पार्थिव शहापूरमध्ये दाखल होताच शहापूर, पिंपरी, शिरवडे परिसरातील ग्रामस्थ व महिलांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पार्थिव घरासमोर ठेवल्यानंतर जवान कृष्णत कांबळे यांच्या घरातील आई जयश्री, वडील दिलीप, पत्नी स्वाती व मुलगी अपूर्वा (वय 8) यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अंत्यदर्शनासाठी महिला, तरुण व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. त्यानंतर पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून कृष्ण्त कांबळे अमर रहे, जय जवान, जय किसान अशा घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली. शिरवडे फाटा येथील मोकळ्या जागेत अग्नी देण्यासाठी तयार केलेल्या तात्पुरत्या जागेत पार्थिव आणण्यात आले.
तेथे पार्थिव ठेवल्यानंतर नायब तहसीलदार कासार, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, उंब्रजचे स.पो.नि. अजय गोरड, मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, जि. प. सदस्य निवास थोरात, भाजपचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, सुहास बोराटे, बी. के. जगदाळे, तलाठी आर. एन. आसवले, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर व शहापूर येथील विविध संस्थांच्या पदाधिकार्यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कृष्णत यांचा चुलत भाऊ रोहन कांबळे याने मुखाग्नी दिला. शहापूर येथील सर्व व्यवस्था सैन्यदलातील निवृत्त सुभेदार सुनील बाबर, निवृत्त हवलदार दीपक मदने, संजय जाधव, विजय जाधव, धनाजी पवार, निवृत्त नाईक, शिवाजी बाबर, हवालदार अजय जाधव, अर्जुन जाधव, शहापूर येथील युवक मंडळे व ग्रामस्थांनी केली होती. गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी उंब्रजचे स.पो.नि. अजय गोरड व मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जवान कृष्णत कांबळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, बहीण, भाऊ, चुलता, चुलती, चुलत भाऊ असा परिवार आहे.