पाटण: गेली २८ वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत क्रीडा उपशिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत असताना मनोहर यादव सर यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आपली प्रतिमा तयार केली. क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना दिलेले प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेपर्यंत घेऊन गेले. यात अनेक विद्यार्थी यशस्वी झाले. यादव सरांनी दिलेल्या या योगदानात कोयना शिक्षण संस्थेसह पाटण तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचले. त्यांनी शिक्षणक्षेत्रा बरोबर शिवप्रेम जागृत ठेवत विद्यार्थ्यांना शिवइतिहासाचे धडे देताना गड संवर्धनाचे कार्य उल्लेखनीय केले आहे. याबरोबर त्यांनी साहित्य क्षेत्राला स्पर्श केला असताना पहिला “पानरेखा” काव्यसंग्रह प्रकाशन करत उत्तम कवी असल्याचे गुण दाखवले आहे. सेवेतून मुक्त झालेल्या यादव सरांनी आता क्रिडा, शिवप्रेम व साहित्य या त्रिवेणी संगमाची पताका जोमाने चालवावी तसेच हा सेवापूर्ती कार्यक्रम नव्हे तर नवीन कार्याचा शुभारंभ आहे अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे क्रिडा व युवक सेवा संचालनालय उपसंचालक अनिल चोरमले यांनी सेवापूर्ती समारंभावेळी दिल्या.
कोयना शिक्षण संस्थेचे क्रिडा शिक्षक मनोहर यादव सर यांचा सपत्नीक सेवापूर्ती सन्मान सोहळा व त्यांनी स्वतः लिहलेल्या पहिल्या “पानरेखा” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी सूस्वाद मल्टीपर्पज हॉल म्हावशी फाटा पाटण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण तालुक्यातील क्रिडा क्षेत्रात मनोहर यादव सर यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी घडविलेले विद्यार्थी – खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत चमकले आहेत. शिक्षणक्षेत्रा बरोबर त्यांनी शिवप्रेम व गड संवर्धनाचे केलेले कार्य देखील उल्लेखनीय आहे. अशा विविध क्षेत्राशी निगडीत असणारा अष्टपैलू एक उत्तम साहित्यिक कवी असल्याचे समोर आले असून त्यांनी रेखाटलेल्या पहिल्या “पानरेखा” काव्यसंग्रह देखील साहित्यप्रेमी व वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.
यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, विजय चोरमारे जेष्ट साहित्यिक पत्रकार, आदींनी मनोगत व्यक्त केले.
या समारंभास प्रा. रविंद्र सोनावले आर. पी.आय पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, यशवंतराव जगताप विश्वहिंदू परिषद उपाध्यक्ष सातारा जिल्हा, राजाभाऊ काळे पाटण तालुकाध्यक्ष, मनसे चे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, चंद्रकांत पाटील, आर.वाय जाधव, रंगराव दरेकर, राजेंद्र पवार, आनंदी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम भोसले सर, प्रास्ताविक युसूफ हकीम, मानपत्र वाचन प्रा.डॉ. दिपक डांगे-पाटील यांनी केले. शेवटी आभार विद्या नारकर यांनी मानले.
या सेवापूर्ती समारंभास किल्ले सुंदरगड-दातेगड संवर्धन समिती पाटण, सातारा जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे, कोयना ट्रेकर्स, सांजवारा परिवार, साद सह्याद्रीची भटकंती परिवार उपस्थित होते.