महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी औंध : मावळत्या वर्षाला निरोप देताना औंध येथील सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी हातात हात घालून मूळपीठ निवासिनी श्री यमाई डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली. ग्रामस्थांनी देखील या मोहिमेचे कौतुक केले.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून श्रमदानाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी गावातील विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना श्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांनी देखील कोरोनाच्या भीषण संकटातून बाहेर पडताना मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवीच्या डोंगरावर श्रमदान करण्यासाठी धाव घेतली.
मूळपीठ डोंगर ते वस्तुसंग्रहालय पर्यंतच्या पायर्यांची व दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांबरोबर चाकरमान्यांनी देखील आवर्जून वेळ काढून या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. पायथ्यापर्यंतच्या पायर्यांची आणि परिसराची स्वच्छता रविवारी झाली नाही. त्यामुळे उर्वरित स्वच्छतेसाठी रविवार, दि. 3 जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहिमेने करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. श्रमदानासाठी बाहेरून आलेल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती.


















