पुरंदर तालुक्यातील निरा ते पिंपरे दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे झाल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे पहायला मिळते. मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज पिंपरी येथील तरुणांनी हे खड्डे सिमेंट खडी टाकून बुजवले.
पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग कडे वर्गीकृत झाला आहे. तेव्हापासून या रस्त्यांवर डागडुजीची कामे केली जात नाहीत. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद झाला आहे.ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. जेजुरी एमआयडीसी ते निरा यादरम्यान रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यातच रस्त्याच्याकडेने अनेक ठिकाणी डांबर निघून गेल्याने सहा इंच ते आठरा इंचापर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसते. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साठते. वेगात आलेल्या वाहनांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे वाहने या खड्ड्यात आढळतात. चार चाकी वाहनांना मोठा धक्का बसून वाहनांचे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या खड्ड्यांमध्ये दुचाकीस्वार पडलेले आहेत. काहीवेळा तर लोकांचे प्राणही गेले आहेत. मात्र तरीदेखील केंद्रीय बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक जण जायबंदी झाले आहेत. या महामार्गावर होणारे दररोजचे छोटे-मोठे अपघात पाहून पिंपरे येथील तरुणांनी एकत्र येत खड्डे स्वतः बुजवले. याबाबत बोलताना निलेश थोपटे म्हणाले की, काल मी रस्त्यावरून जात होतो खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्यात गाडी जोरात आदळली. दैवलत बलवत्तर म्हणून मी पडता-पडता वाचलो. यानंतर मी पुढे येत असताना अशा प्रकारचे अनेक पाहीले हे खाड्डे चुकवण्यासाठी अनेक वाहने रस्त्याच्या मध्ये येत होती व एकमेकाला धडकण्याची शक्यता निर्माण होत होती म्हणून गावातील तरुण बरोबर चर्चा करून हे खड्डे बुजवण्याचा आम्ही निर्णय घेतला.
याच मार्गावर जेजुरी ते दौडज रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघात झाले होते. जेजुरी पोलिसांनी दररोज होणारे अपघात टाळण्यासाठी स्वतः हे खड्डे बुजवले. मात्र पोलिसांनी बुजलेल्या खड्ड्यांच्या बातम्या वृत्तपत्रात आल्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पोलिसांनाच झापले होते. तुम्ही फक्त तुमचे काम करा. खड्डे बुजवणे तुमचे काम नाही. असे त्यांनी त्यांना सुनावले होते. मात्र असे करत असताना केंद्रीय बांधकाम विभागाला सुद्धा तुमचे काम तुम्ही करा असे सांगितले असते तर बरे झाले असते. असे लोकांमधून बोलले जात आहे.