मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं आहे. मात्र, राज्यात आरक्षण लागू असताना परीक्षा देऊन निवड झालेल्या उमदेवारांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. या उमेदवारांना राज्य सरकारने नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी मराठा समाजातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केली आहे. मात्र, सरकार या मागणीकेड दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन देऊन आमचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली आहे.
राज्यातील रखडलेल्या एसईबीसी नियुक्त्यासंदर्भात शुक्रवार 18 मे रोजी एका शिष्टमंडळाने उदयनराजे यांची जलमंदिर पॅलेस येथे जाऊन भेट घेतली. एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या 2185 उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी मागणी उदयनराजेंकडे केली. त्यानंतर, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून मागणी करणार असल्याचे आश्वासन उदयनराजेंनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील या उमेदवारांना दिला आहे.
राज्यसेवेप्रमाणेच विविध सरळसेवा भरती प्रक्रिया 9 सप्टेंबर 2020 रोजीच पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सरकारने कोविडच्या कारणास्तव उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले नाही. या नियुक्त्या ऑगस्ट महिन्यातच होणे अपेक्षित होते, पण सरकारने कोविडच्या कारणास्तव आम्हाला थांबवून ठेवले. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन खटला, सरकारचा वेळकाढूपणा आणि कोरोनाचं कारण या सगळ्यात निवड झालेले उमेदवार भरडले जात आहेत. त्यामुळे, सरकारने प्राधान्याने लक्ष देऊन आम्हाला नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी या उमेदवारांच्या शिष्टमंडळाने खासदार उदयनराजेंकडे केली आहे.