दहिवडी : ता.०१
मलवडी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या शैनाजबी रफिक मुलाणी यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाले असून त्यांना कधीही निवडणूक लढवता येणार नाही, अशाप्रकारचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
प्रिया सुभाष सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या अर्जावरून शैनाजबी रफिक मुलाणी यांना तीन अपत्ये आहेत, त्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या सर्व प्रकाराची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू होती. या दरम्यान झालेल्या फेरचौकशीत शैनाजबी मुलाणी यांना तीन अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले. निवडणूक प्रक्रियेत त्यांना तीन अपत्ये असतानाही दोनच अपत्ये असल्याचे दाखवत त्यांनी घोषणापत्र दिले होते. त्यामुळे खोटे घोषणापत्र जोडल्याप्रकरणी सुर्यवंशी यांनी याबाबत हरकत घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रारी अर्ज केला होता.
त्यानुसार शैनाजबी मुलाणी यांना राहत नामक एक मुलगा आणि सिमरन सह अजून एक मुलगी अशा एकूण दोन मुली(त्यापैकी एकीची दहिवडी नगरपंचायतीच्या रेकॉर्डला नोंद नाही.) असल्याने सूर्यवंशी यांचा अर्ज मान्य करत मुलाणी या निवडणूक लढवण्यास अपात्र असून त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.तसेच त्यांना निवडून येण्यास कायमस्वरूपी निरर्ह करण्यात आले आहे. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केला आहे.
चौकट :
०१)जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रफिक मुलाणी यांना आणि देसाईंना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर शैनाजबी मुलाणी या रफिक मुलाणी यांच्या पत्नी असल्याने रफिक मुलाणी यांनाही यापुढे निवडणूक लढवता येणार नाही.
चौकट :
०२)भाजपकडून टाकलेल्या जाळ्यात मुलाणी अलगद अडकले?
हा तक्रारी अर्ज आणि सर्व प्रक्रिया ही भाजपकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपकडून टाकलेल्या जाळ्यात रफिक मुलाणी हे अलगद अडकले व त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा मलवडी पंचक्रोशी आणि माण’च्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.






















