मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं शरद पवारांना सांगितल्याचं संभाजीराजे भेटीनंतर म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करुन संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार अशी माहितीही संभाजीराजे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संभाजीराजे छत्रपती आज सकाळी साडेनऊ वाजता सिल्वर ओकवर पोहोचले. त्यानंतर नऊ वाजून 43 मिनिटांनी शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 13 मिनिटं चर्चा झाली.
भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले?
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “गेले तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितलं. एकंदरीत मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला. उद्या या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी मुंबई पत्रकार परिषद घेणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेऊन सर्व परिस्थिती मांडली.