सातारा : कोविड-19 मुळे दोन्ही पालक व एक पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटीवेळी बालकांचे समुपदेशन करण्यासाठी एक समुपदेशक तसेच आवश्यकता असल्यास कायदेशीर मदत देणेसाठी विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत एक वकीलासमवेत गृहभेट देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. तसेच सातारा जिल्ह्यातील कोविड-19 मुळे विधवा झालेल्या एकूण 2394 महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे संगोपन होण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षक्षतेखाली जिल्हास्तरावर कृतीदल गठित करण्यात आलेला आहे. या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे अध्यक्षक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस कृती दलातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी सातारा जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांकडून सर्वेक्षणामध्ये केल्यावर प्राप्त यादीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेले एकूण 9 बालक व एक पालक गमावलेले एकूण 585 बालकांची तालुकानिहाय माहिती बैठकीमध्ये जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी रोहीणी ढवळे यांनी दिली. या बालकांच्या घरी जिल्हा कार्यालय व परिविक्षा अधिकारी यांचेमार्फत गृहचौकशी करुन त्यांना बाल संगोपन योजनेचा तसेच शासन निर्देशाप्रमाणे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तसेच त्यांचे संगोपन करण्यास कोणीही नातेवाईक नसल्यास त्यांना बालगृहामध्ये दाखल करून अन्न, वस्त्र ,निवारा आरोग्यसुविधा, शिक्षण, प्रशिक्षण इ . सुविधा उपलब्ध करुन त्यांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे.
कोविड-19 मुळे दोन्ही पालक व एक पालक गमावलेल्या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी अशा बालकांची माहिती चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाईन क्रमांकवर देण्यात यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.