फलटण प्रतिनिधी – जिंती ता. फलटण येथील पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ करूनही पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत गुन्हा दाखल न झाल्यास उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्या वळुंच्या पाठीशी महसूल विभाग व त्यांचे अधिकारी तोडपाणी करीत असल्याने या वाळू माफियांनी फलटण तालुक्यात उच्छाद मांडला आहे.
जिंती ता. फलटण गावचे दैनिक लोकमत चे पत्रकार प्रशांत रणवरे हे सतत पडत असलेल्या पावसाची व नुकसानीचे वृत्तांकन करण्यासाठी जिंती येथे गेले होते, यानंतर सर्व वृत्तांकन करून ते जिंती गावच्या बस स्टँडवर थांबले असता प्रमोद रघुनाथ रणवरे व ईतर दोन अनोळखी वाळू माफियांनी महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना तू वाळू उपसा ची माहीती देतो, असे म्हणत त्यांनी प्रशांत रणवरे यांना दमदाटी, शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली,सदर घटना घडल्यानंतर पत्रकार प्रशांत रणवरे यांनी ही बाब पत्रकार नाशिर शिकीलगर यांच्या कानावर घातली त्या नंतर हे दोघे ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस कर्मचारी यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला.या मुळे सर्व पत्रकारांच्यात चीड निर्माण झाली, व या गुन्ह्याची नोंद न केल्याने मंगळवार दि.२२जून रोजी सकाळी ११. वाजता उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, रवींद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता,प्रा.रमेश आढाव,सुभाष भांबुरे व इतर जेष्ठ पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली येथील रेष्ट हाऊस येथे बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यासह तालुक्यातील पत्रकार यांनी याप्रकरणी कडक भूमिका घेत वाळू माफिया यांना चुकीची माहिती देणाऱ्या जबाबदार महसूल अधिकारी व कर्मचारी
यांच्यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनीकारवाईची करण्याची व पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यानंतर फलटण शहर व तालुका पत्रकार यांनी या घटनेच्या निषेधार्थ एकत्रित येत या घटनेचा निषेध करून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात एकत्रित येत संबंधित आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांना पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी जाब विचारत आरोपीला कोणत्या महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रकार प्रशांत रणवरे यांच्याबाबत वाळू माफियांना चुकीची माहिती दिली याबाबत चौकशी करण्याची मागणी करत पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवार दिनांक २२ रोजी उपोषण सुरू करण्याचा ईशारा दिला. पोलिस अधिकारी यांनी कायद्याची पळवाटा न काढता याप्रकरणी कठोर कारवाई न केल्यास पत्रकारांच्या रोषाला समोर जावे लागेल असे यावेळी पत्रकारांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
विविध विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर अवैध धंदे, वाळू माफिया, जुगार, मटका, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही पत्रकार यांचा काडीमात्र संबंध नसताना पत्रकार यांचे नावे पुढे करत असून अनेकवेळा पत्रकारांच्या नावाखाली कारवाई करण्याची भीती दाखवत आर्थिक मागणीही करत असल्याची बाब समोर येत असल्याचे यावेळी बैठकीत निदर्शनास आणून दिले. यापुढे विनाकारण पत्रकारांची नावे पुढे करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना जशासतसे उत्तर देण्याचा इशारा पत्रकार संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यापुढे कोणत्याही पत्रकारांच्या विरोधात गंभीर घटना घडल्यास त्यास खंबीरपणे उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, रमेश आढाव, सुभाष भांबुरे, राजेंद्र भागवत, नसीर शिकलगार, अजय माळवे, दादासाहेब चोरमले, यशवत खलाटे(पाटील), बाळासाहेब ननावरे,बापूराव जगताप, प्रकाश सस्ते, संजय जमादार, युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले, चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे, दीपक मदने,विकास अहिवळे, राजेंद्र गोफने, अमोल नाळे, प्रवीण काकडे, उमेश गार्डे, शेखर जगताप, अमिरभाई शेख, उद्धव बोराटे,विठ्ठल शिंदे, संजय गायकवाड व ईतर पत्रकार यावेळी उपस्थित होते.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनीही प्रशांत रणवरे यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन यांना विनंती केली आहे असे सांगितले
चौकट
गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रकरणी पोलिस अधिकारी यांना मुजोर वाळू माफियावर कडक कारवाई करण्याची सूचना दिल्या तसेच फलटण शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांना फलटण तालुक्यातील पत्रकार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
चौकट – महसुल पोलिस आणि वाळु उपसा करणारे वळू यांच्यात परस्पर संबध असतात हे पत्रकारांनी अनेकदा उघडकीस आणले आहे पत्रकारांना तोंडावर गोड आणि पाठीमागे वाईट बोलण्याची महसूल व पोलिस प्रशासनाची अनेक वर्षाची घाणेरडी परंपराच आहे याचे गांभीर्य लक्षात घेवुन शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार ‘ विविध साप्ताहिकांचे संपादक या पुढे महसूल व पोलिस प्रशासनाबरोबर असहकार आंदोलन करणार आहे – प्रा.रमेश आढाव जेष्ठ पत्रकार फलटण