महाविद्यालय व शाळांची अचानक होणार तपासणी
संपर्कात आलेल्या नागरिकांनी टेस्ट न केल्यास दाखल होणार गुन्हा
सातारा दि. 22 : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (ऑनलाईन ), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
1 फेब्रुवारी पासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, हॉटेल, रेस्टॉरंट महामार्गांवरील वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात यावी. लग्न समारंभाला वधू कडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यावर कारवाई करावी.
राज्यासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 100 टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आज बाजारांमध्ये कुठेही सुरक्षित अंतर पाळले जात नाही तरी ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी विक्रेते यांच्यासाठी अंतर राखून जागा उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे.
महाविद्यालय, शाळा सुरु झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्त पणे अचाकन महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करावी. जिल्ह्यात 71 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षीत असून खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवानही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरोना टेस्टींग केली नाहीतर होणार गुन्हा दाखल
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात वाढत आहे. काही तालुक्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की, एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्या संपर्कात आलेले कोरोनाची तपासणी करुन घेत नाहीत, असे आढळल्यास प्रशासनाकडून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, असे आदेशही पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत दिले.
मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यावर गुन्हे दाखल करा
मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.