कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे यंदाही गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजना कराव्यात. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मास्क सँनीटायझर, ऑक्सीजन मशीन आधी वस्तू वाटप कराव्यात अथवा रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी केले.
हेळगाव ता. कराड येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपसरपंच संजय सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ सूर्यवंशी, विक्रम कुंभार, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सपोनि गोरड पुढे म्हणाले, माणसाच्या जिवापेक्षा कोणताही सण उत्सव मोठा नाही ही जाणीव ठेवावी. गतवर्षीही कोरोनाच्या काळात येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले होते. यापुढेही असे सहकार्य करावे. गावातील युवकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून ग्राम सुरक्षा दलात सहभागी व्हावे असे आवाहन करून प्रशासनाच्या नियमाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष हणमंत पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, संचालक सुभाष पाटील, रामचंद्र पाटील, सदाशिव पवार, सुभाष कदम, पोलीस कर्मचारी पृथ्वीराज जाधव, स्वप्नील मोरे आदीसह रोहित जगदाळे, श्रीधर पाटील, सचिन सूर्यवंशी, धैर्यशील जगदाळे, गणेश चव्हाण, अमर जाधव, शिवाजी पाटील व गावातील विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक व सूत्रसंचालन माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांनी केले. आभार तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे यांनी मानले.
तंटामुक्ती समिती सक्षम करा…..
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावांची संख्या जास्त व पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच अनेक वादविवाद हे नवरा बायकोचे भांडण, बांधावरून वाद, जमिनीवरून वाद यामध्येच पोलिसांचा जास्त वेळ जात असून प्रमुख गुन्ह्यांकडे बघायला वेळ मिळत नाही. यासाठी गावातील तंटामुक्ती समिती सक्षम करून बांधावरचे वाद तसेच किरकोळ वाद विवाद गावातच मिटवावेत व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सपोनि अजय गोरड यांनी केले.