कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव यांच्यावतीने मौजे अनवडी, ता. जि. सातारा या गावांत हळदीचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके राबविले जात आहेत. त्यामाध्यमातुन कुरकुमीन हा घटक जास्त असलेले वाणाची प्रक्षेत्र चाचणी तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हळद तंत्रज्ञानामध्ये फर्टिगेशनद्वारे ड्रिपमधुन विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खताचे व्यवस्थापन व इतर तंत्रज्ञान वापरुन उत्पन्नवाढीसाठी प्रात्यक्षिक राबविले जात आहेत.
या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी जिवामृताचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले तसेच कृषि दिनाच्या माध्यमातुन एकात्मिक खत व्यवस्थापन जिवाणु खतांचा वापर, सेंद्रीय खतांचा वापर याविषयावर चर्चा करण्यात आली व गावातील शेतकऱ्यांसोबत हळद प्रक्षेत्रावर शिवार फेरी घेण्यात आली.
जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन होण्यासाठी त्यामाध्यमातुन उत्पादन वाढीसाठी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे, असे श्री. भुषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) यांनी नमुद केले. श्री. सागर सकटे, विषय विशेषज्ञ यांनी कृषि पुरक उद्योगातुन उत्पन्न वाढीसाठी अवलंबिण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली तसेच कृषि विज्ञान केंद्रामार्फत मल्टीकट ज्वारीचे प्रात्यक्षिकांची माहिती दिली. श्री.सुजित जगताप, कृषि सहाय्यक यांनी कृषि विभागाच्या योजनांची माहिती दिली.