महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दि. १५ सप्टेंबर रोजी दि कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून असोसिएशन सन २००५ पासून “विश्वेश्वरय्या पुरस्कार जाहीर करते. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात भरीव योगदान देणान्या स्थापत्य अभियंत्यास” हा पुरस्कार देण्यात येतो. आजवर अनेक मान्यवर “स्थापत्य अभियंत्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यंदाचा हा पंधरावा पुरस्कार कराड शहरातील वरीष्ठ “स्थापत्य अभियंता” इंजि. अरूणराव आबासाहेब जानुगडे यांना ५५ वा अभियंता दिन दिवशी स्वर्गीय सौ वेणूताई चव्हाण स्मारक येथे माजी कॅबिनेट मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका “स्वातंत्र्य सैनिकाच्या” मुलाचा असोसिएशनच्या वतीने यथोचित गौरव होतोय हा एक दुर्मिळ योगायोगच आहे.
मा.अरुणराव जानुगडे यांचे मूळ गाव जानुगडेवाडी ता.पाटण जि.सातारा हे असून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत “स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी (B.E.Civil) शासकीय महाविदयालय, कराड येथून प्रथम श्रेणीमध्ये (First Class) पास होवून मिळविली. त्याकाळी सरकारी नोकरी सहज मिळत असताना सुध्दा स्वतंत्र व्यवसाय करण्याचे धाडस त्यंनी दाखवले व आपल्या कृतीतून त्यांनी ते सार्थ केले.
आजवर त्यांनी शेकडो छोटया-मोठया बंगल्यांची कामे केली. रयत शिक्षण संस्थेसारख्या नावाजलेल्या संस्थेच्या अनेक इमारती उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज संस्थेच्या उभ्या असलेल्या उत्तुंग इमारती त्यांच्या कामाचा पोहोचपावती देतात. या कामाची दखल घेवून रयत शिक्षण संस्थेने त्यांचा त्यावेळचे स्थायी समिती सदस्य मा.आ.कै. केशवराव पवार व मा. मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुलेसाहेब यांच्या हस्ते कराड येथील सदगुरू गाडगे महाराज कॉलेजच्या कार्यक्रमात जाहिर सत्कार करण्यात आला होता.
स्वतः बांधकाम व्यवसाय सांभाळत श्री. अरूणराव जानुगडे यांनी अनेक सामाजिक क्षेत्रात काम केले. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावयाचा झाल्यास लिओ क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. कराड अर्बन को-ऑप बँक लि., कराड चे संचालक होते, आदरणीय आण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास साताराचे ते कराड तालुका अध्यक्ष होते.
त्यांनी बांधकाम व्यवसाय करत अनेक छोटे व्यवसाय उभारले. यामध्ये गजानन महाराज मोझॅक टाईल्स कारखाना, डोलामाईट कारखाना, श्रीराम मंगल कार्यालय यांचा उल्लेख करता येईल.
या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी प्रमुख पाहुणे मा. आमदार श्री. बाळासाहेब पाटील (माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर सन्माननीय अथिती म्हणून मा. श्री सारंग पाटील यांची उपस्थिती होती.
दि कराड आर्किटेक अँड इंजिनियर
असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री. सतिश पाटील, सचिव श्री.नंदकुमार साळुंखे उपाध्यक्ष मा. श्री. परेश देवळेकर, खजिनदार श्री. चंद्रकांत पोळ, संचालक श्री. श्रीकांत देसाई, राजुरी स्टील या कंपनीचे अधिकारी व श्री. दिग्विजय जानुगडे, श्री. अमीर शेख, श्री. मुनाफ वाईकर व सर्व सभासद तसेच महाराष्ट्रातून अनेक अभियंता या पुरस्कार सन्मान सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते.