महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
▪️ बँक कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजना ऐच्छिक
▪️ कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसेल तर लेखी कळविणे बंधनकारक
▪️ लेखी कळविले नसल्यास सहभागी होणार असे समजण्यात येईल
▪️ 4 हेक्टर मर्यादेपर्यंत एका हंगामाचाच या योजनेत लाभ घेता येईल
सातारा दि. 30 : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
ही योजना कर्जदार शेतकऱ्यांनाही ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली असून ज्या कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हावयाचे नसेल त्यांनी वित्तीय संस्थेस तसे लेखी अवगत करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना बँकांकडे उपलब्ध आहे. कर्जदार शेतकऱ्यांने योजनेत सहभागी होणार नसल्याचे लेखी न दिल्यास त्यास योजनेत सहभागी व्हावयाचे आहे, असे समजून त्याचा विमा हप्ता कपात केला जाणार आहे.
नवीन बदलानुसार एका शेतकऱ्यांस 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण घेता येईल, त्यापेक्षा जास्त क्षेत्रास विमा संरक्षण घेता येणार नाही. सहभागी शेतकरी एका फळपीकासाठी एका वर्षात एकाच हंगामात (मृग किंवा अंबिया) सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यास दोन्ही हंगामात सहभागी होता येणार नाही.
या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक अर्जासोबत जिओ टॅगींग केलेला फोटो सोबत सहपत्रित करणे आवश्यक आहे. बँकांनी शेतकऱ्यांचा विमा हप्ता थेट विमा कंपनीस न पाठविता तो विमा योजना पोर्टलवरुन केंद्र शासनाकडे जमा करावा. केंद्र शासनाकडून तो विमा कंपनीस अदा होणार आहे, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.