मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे संकेत दिले आहेत. माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
राज्यातील रेड झोन असलेले जिल्हे?
राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे.
या’ जिल्ह्यांमध्ये 10 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण
महाराष्ट्रात काल रविवारी, 29,177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. मुंबई-ठाण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर एवढ्याच जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या म्हणजे ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुंबईत 28284 आणि ठाण्यात 24894 सक्रिय रुग्ण आहेत तर पुण्यात 51182 सक्रिय रुग्ण आहेत. साताऱ्यात 18336 तर सांगलीत 12211 आणि कोल्हापुरात 14919 आणि सोलापुरात 18487 तर नाशिकमध्ये 15946 आणि अहमदनगरमध्ये 16903 उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. विदर्भात नागपूरमध्ये कोरोनावर 17635 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे तर मराठवाड्यात लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी आणि विदर्भात वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तर पाच हजारांच्या आत आहे.