महाराष्ट्र न्यूज / पाटण प्रतिनिधी : बाळासाहेब देसाई कॉलेज मधील भूगोलशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. चंद्रकांत माने यांना एक्सलंट टीचर अवॉर्ड ने पुरस्कारीत करण्यात आले. कोल्हापूर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मा. उदयजी सामंत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कारीत रणजीत डिसले हे उपस्थित होते. डॉ. चंद्रकांत माने यांना एक्सलंट टीचर अॅवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. चंद्रकांत माने हे बाळासाहेब देसाई कॉलेज याठिकाणी गेली ३५ वर्षे अध्यापन करीत आहेत. सन २०१५-१६ मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि सोलापूर विद्यापीठ भूगोल शिक्षक संघाच्या वतीने त्यांना ‘भूगोल भूषण’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते. डॉ. माने यांनी आपल्या कार्यकाळात रिसर्च गाईड, महाराष्ट्र भूगोल शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, भूगोलशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, विद्यार्थी विकास समितीचे सदस्य, महाराष्ट्र भूगोल परिषद पुणे चे सहसचिव, युवा महोत्सवाचे जिल्हा समन्वयक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये फॅकल्टी सदस्य अशी अनेक मानाची पदे सांभाळली आहेत. तसेच आपल्या शैक्षाणिक कारकिर्दीत त्यांच्या नावाने २२ पुस्तकांच्या घटकांचे लेखन झाले आहे. तर १२ पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. जवळपास ३५ शोध निबंध प्रसिद्ध झाले असून ४४ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत संशोधन पेपरचे सादरीकरण केले आहे. शिक्षण क्षेत्राशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांचा अनुभव मोठा आहे. कराड येथील सह्याद्री बँक, अर्बन बँक, सह्याद्री साखर कारखाना, जनता बँक, प्रीतीसंगम पाणीपुरवठा सोसायटीचे सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. सद्या डॉ. माने हे ७ विद्यार्थ्यांना पी.एच.डी. चे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. तर त्यांनी २० पी.एच.डी. प्रबंधाचे सूक्ष्म मुल्याकन केले आहे.
डॉ. चंद्रकांत माने यांना एक्सलंट टीचर अॅवॉर्ड पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, सहसचिव बाळासाहेब पाटील, युवा संचालक संजीव दादा चव्हाण, याज्ञसेन पाटणकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.पवार, सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय सेवक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण, डी.एन. संकपाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.


















