महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये प्राथमिक स्तरावर बी. एड. पदवी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात डी. एड. पदविका कालबाह्य होण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे यंदा डी. एड च्या प्रवेशाला उतरती कळा लागली असल्याचे चित्र आहे.
यंदाही प्रवेशसंख्या घटली
राज्यात दहा वर्षांपासून डी. एड पदविकेला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. राज्यात एकूण मंजूर असलेल्या प्रवेश क्षमतेपैकी अवघे ३५ टक्के प्रवेश शिक्षणशास्त्र पदविकेला होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे प्राथमिक साठी डी. एड. पदविका येणाऱ्या काळात कालबाह्य होण्याचा धोका आहे. राज्यात १४ डी. एड. शासकीय विद्यालये आहेत. त्यात ७९७ इतकी क्षमता असून, गेल्या वर्षी केवळ ५३६ प्रवेश झाले आहेत. अनुदानित ९७ अध्यापक विद्यालये असून, चार हजार ५४५ प्रवेश क्षमता असून, त्यापैकी केवळ ३ हजार १८० प्रवेश झाले आहेत.
अनेक संस्थाचालकांनी यापूर्वीच कुलूप लावले
राज्यात ७२० विनाअनुदानित अध्यापक विद्यालये असून, ४६ हजार ६२० प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी अवघे १४ हजार २६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अशा एकूण ८३१ अध्यापक विद्यालयातील ५१ हजार ९६२ प्रवेश क्षमतेच्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेश क्षमतेच्या अवघे ३५ टक्के विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या ७३१ अध्यापक विद्यालये आहेत. शासनाने यापूर्वीच स्वतःची अध्यापक विद्यालये बंद केली आहेत, तर अनेक संस्था चालकांनी यापूर्वीच डी.एड.महाविद्यालयांना कुलूप लावले आहे. राज्यात कधीकाळी एक लाख विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती.