लहानपणापासून चित्रपटात काम करण्याच त्याचं स्वप्न होतं. बारावी शिक्षण झाल्यानंतर त्यानं यु ट्यूबवरील एका छोट्याशा वेबसीरिजमध्येही त्यानं काम केलं. पण त्याला संधी काही मिळतं नव्हती.चित्रपटात हिरो बनन्याचं त्याचं स्वप्न अपूर्णचं राहत असल्याचं लक्षात येताच त्यानं विहिरीत उडी घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं. ही घटना फलटण तालुक्यातील गोखळीपाटी येथे २ जानेवारी रोजी घडली.अतुल राजेंद्र शिंदे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल शिंदे याला चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा होती. यू ट्यूबवरील एका मराठी वेबसिरीजमध्ये त्याने काम केलं होतं. एक दिवस आपण नक्कीच चित्रपटात हिरो म्हणून काम करणार, असं तो आपल्या घरातल्या लोकांना आणि मित्रांजवळ बोलून दाखवायचा. हा छंद जोपासत तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. मात्र, त्याला चित्रपटात संधी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. तो सतत विचार करत असायचा. यातूनच त्याने फलटण तालुक्यातील गोखळी पाटीजवळील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.ही घटना जेव्हा त्याच्या घरातल्यांना समजली तेव्हा त्यांना जबर मानसिक धक्का बसला. सोशल मीडियावर तो सतत सक्रिय असायचा. एक दिवस आपले स्वप्न पूर्ण होइल, गॅरेजमध्ये आपल्याला काम करावे लागणार नाही, असं त्याला वाटत होतं. पण स्वप्नांचा पाठलाग करण्यापूर्वीच त्यानं स्वत:चं आयुष्य संपवलं. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नाेंद झाली असून, हवालदार साबळे हे अधिक तपास करीत आहेत.