सातारा : सन 2020 मधील राज्यस्तरीय रब्बी हंगाम ज्वारी पीक स्पर्धेत सातारा जिल्हयातील जावली तालुक्यातील दुर्गम भागातील प्रगतशिल शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे, रा. सोनगांव, ता. जावली यांनी ज्वारीच्या फुले रेवती वाणाचे हेक्टरी १०१ क्विंटल इतके उच्चांकी उत्पादन घेऊन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याबरोबरच वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील युवा शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांनी हेक्टरी ९० क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. या शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने मौजे सोनगांव, ता. जावली येथे शेतकरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे मा. संचालक, विस्तार शिक्षण तथा संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांनी या पुरस्काराचे मानकरी दोन्ही शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ विद्यापीठाचे प्रकाशन कृषि दर्शनी आणि रेवती वाणाचे बियाणे एक बॅग देऊन सन्मान केला. फुले रेवती हा ज्वारीचा वाण विकसित करण्यामध्ये डॉ. गडाख यांचा सिंहाचा वाटा आहे. याप्रसंगी बोलतांना डॉ. गडाख यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करुन तसेच नवीन वाण वापरुन यापुढेही सातारा जिल्हयातील शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत राज्यातच नव्हे तर, देशात नाव लौकिक मिळवावा, असे आवाहन केले.
संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कायम मार्गदर्शन करणारे दोन्ही गांवचे कृषि सहाय्यक भानुदास चोरगे व मनोज पाटील यांनाही या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी योग्य समन्वय ठेवुन फुले रेवती वाणाचे प्रात्यक्षिक आयोजित करून ज्वारीचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा. मोहन शिर्के यांनी प्रास्ताविक केले. यानंतर जावली तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. देशमुख व उपविभागीय कृषि अधिकारी, वाई श्री. गोरड यांनी ज्वारीच्या पीक स्पर्धेविषयी माहिती दिली तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काळे यांनी शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विपणन व्यवस्था विकसित करावी असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कृषि विद्यापीठ, राहुरी येथुन ज्वारी सुधार प्रकल्पातील ज्वारी पैदासकार, किटकशास्त्रज्ञ, रोगशास्त्र विभागातील तज्ञानी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान तसेच विकसित वाण यावर मार्गदर्शन केले. जावली तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदीप शिंदे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त सन्मानीत शेतकरी चिकने व वरखडे यांनी कृषि विद्यापीठाच्या फुले रेवती या ज्वारी वाणाचे कौतुक करुन या वाणामुळेच स्पर्धेत यशस्वी होणे शक्य झाल्याचे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. महेश बाबर व आभार प्रदर्शन भुषण यादगीरवार यांनी केले.