महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण स्थगितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी व नोकरीसाठी प्रक्रिया पूर्ण होऊन देखील अडचण येणार आहे, असे विद्यार्थी व नोकरी इच्छुक मराठा तरुणांतर्फे मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुकाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्याचा निर्णय विद्यार्थी परिषदेमध्ये घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात अॅड. प्रशांत केंजळे हे मराठा विद्यार्थी व तरुणांच्यावतीने बाजू मांडणार आहेत.
मलकापूर (कराड) येथील सोनाई मंगल कार्यालय येथे मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका यांच्यावतीने विद्यार्थी परिषद संपन्न झाली. या विद्यार्थी परिषदेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील अॅड. प्रशांत केंजळे, कराड तालुक्यातील मराठा बांधव, विशेषत: विद्यार्थी, पालक व तरुण उपस्थित होते.
या परिषदेमध्ये दि. 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन देखील प्रवेशासाठी निर्माण झालेल्या अडचणीबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. महावितरण व इतर शासकीय विभागाची भरतीप्रक्रिया पूर्ण होऊन देखील नियुक्त्या न मिळालेल्या तरुणांनी त्यांच्यावरील अन्याय परिषदेमध्ये व्यक्त केला.
मराठा आरक्षण संदर्भात मराठा बांधवांनी त्यांच्या पुढील शंका व प्रश्न मांडत भविष्यातील आंदोलनाची भूमिका काय असावी हा मुद्दा उपस्थित केला. अॅड. प्रशांत केंजळे म्हणाले, आंदोलन हे शांतताप्रिय व कायदेशीर मार्गाने करणे गरजेचे आहे. दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण स्थगितीचा आदेश आला. त्याआधी ज्या विद्यार्थी प्रवेश व नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या मराठा तरुणांचा न्यायालयीन लढा गरजेचे आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दोन जनहित याचिका विद्यार्थ्यांच्यावतीने व नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या तरुणांच्यावतीने दाखल करण्यात येणार आहे. मराठा समाजातील विद्यार्थी व तरुणांनी आत्महत्या किंवा इतर कोणत्याही प्रकारचे चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करत मराठा बांधवांच्या प्रश्नासाठी मराठा मावळा सक्षम असून समाजाच्या लढ्याला नक्कीच यश येईल, असे मराठा क्रांती मोर्चा कराड तालुका यांच्यावतीने सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील बाधित विद्यार्थी व नोकरी प्रक्रियेतील बाधित मराठा तरुणांनी या न्यायालयीन लढाईत याचिका दाखल करण्यासाठी सहभागी होण्यासाठी मोबा. 9637549401, 9730604604, 9405502205 या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा कराड तालुक्याच्यावतीने घेण्यात आलेली विद्यार्थी परिषदेच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवून व सर्व शासकीय नियमांचे पालन करून पार पडली. या परिषदेचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
































