वन्यजीव सप्ताहानिमित्ताने वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा संदेश देण्याकरीता वाई शहरातून काढण्यात आली रॅली
वाई : राष्ट्रीय स्तरावर दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर दरवर्षी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यावर्षी वाई वनपरिक्षेत्र, खंडाळा वनपरिक्षेत्र व किसनवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे संयुक्त विद्यमाने यांनी वाई शहरातून रॅली काढून घोषणा देत, वन्य जीवन संरक्षण व पर्यावरण संरक्षण याविषयी जनजागृती केली. हा कार्यक्रम किसनवीर महाविद्यालय येथे पार पडला.
सूत्रसंचालन वनरक्षक एस.पी.पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन्यजीव संरक्षण सप्ताहानिमित्त पोस्टर बनविणे स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते. रांगोळी स्पर्धेमध्ये पहिला नंबर श्रावणी यादव, दुसरा नंबर करिष्मा मांढरे, तिसरा नंबर साक्षी जाधव तसेच पोस्टर स्पर्धेत पहिला नंबर संतोषी काळे, दुसरा नंबर भास्कर मोरे, तिसरा नंबर श्रेया दाभाडे, या सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.
वनपाल संग्राम मोरे यांनी आपल्या मनोगतात वन्यजीव सप्ताह याचे महत्त्व सांगितले. वन्यजीव संरक्षण प्राणी संरक्षण कसे करावे तसेच प्राण्यांची तस्करी, हत्या याचे दुष्परिणाम ही सांगितले. वन्यजीव व पर्यावरण याचे कोणी नुकसान करत असल्याचे आढळल्यास वनविभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे ही आवाहन केले.
वनरक्षक सुरेश पटकारे यांनी वन्यजीव या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून प्रत्येक महिन्यातून एकदा असा वन्यजीव व पर्यावरण संरक्षण यावर एक कार्यक्रम घ्यावा असे वाटत असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे मानव व वन्यजीव संघर्ष त्यांच्यातील एक प्रसंग सांगितला. त्यात त्यांनी एका मयत हत्तीची हृदय पीळवटनारी सत्य घटना सांगितली. वन्यप्राण्यांना जीवदान देणे व वनवा लागण्यापासून संरक्षण याची जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
किसनवीर महाविद्यालयाच्या कोकरे सर यांनी बोलताना सांगितले की, वनविभाग यांनी असे कार्यक्रम वारंवार घ्यावेत जेणेकरून आम्हाला व विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनसंरक्षण याची ऊर्जा मिळेल. त्यांनी त्यांचा निसर्ग पर्यटनाचा अनुभव सांगितला. प्राण्यांची तस्करी यावर मार्गदर्शन केले. प्राणी जीव आणि मनुष्य यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से सांगितले.
वाईच्या वनक्षेत्रपाल स्नेहल मगर यांनी झाडे ऑक्सिजन निर्मितीचे काम करतात. कोरोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व पटले आहे. असे सांगून वन विभागाचे कार्य ही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जंगली प्राणी जंगल सोडून लोकवस्तीकडे का येत आहेत, याची कारणेही सांगितली. नवीन पिढीला प्राण्यांची तस्करी यावर जनजागृती करण्याचे व प्राण्यांना बंदिस्त न करण्याचे आवाहन केले. नोव्हेंबर महिन्यात असणाऱ्या पक्षी सप्ताहाची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य भालेराव सर यांनी वन्यजीव यावर मार्गदर्शन केले. वन्यजीवांचा कसा माणसाशी डायरेक्ट संबंध आहे ते सांगितले व मार्गदर्शन केले. जंगल तोडीचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जंगल वृद्धीतून आर्थिक उत्पन्न कसे घेता येईल याची माहिती सांगितली. वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचे महत्त्व पटवून दिले. वनविभागाला असे कार्यक्रम वारंवार घेण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने आमंत्रित केले. आभार प्रदर्शनाचे काम वनरक्षक विश्वास मिसाळ यांनी केले.