कोळकी : साखरवाडी, ता. फलटण येथे जुगाराचा व्यवसाय करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे साडे एकवीस हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 16 डिसेंबर रोजी साखरवाडी, ता. फलटण येथे पाच आरोपी स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी पैसे घेऊन जुगाराचा व्यवसाय करित असल्याची गोपनिय माहिती मिळाली. संजय यशवंत देवकर (वय 41), विजय शिवराम गायकवाड (वय 50), दोघेही रा. साखरवाडी, अजय शामराव जाधव (वय 28) रा. खामगाव, अमोल भाऊसाहेब भांडवलकर रा. सुरवडी, संजय सदाशिव जाधव रा. बारा फाटा होळ सर्वजण तालुका फलटण येथील आहेत.
त्यांच्याकडून मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, प्रिंटर, स्कॅनर, प्लास्टिक खुर्च्यी आदी आणि रोख तीन हजार साठ रुपये असे एकूण 21 हजार 460 रुपये किमतीचे साहित्य मिळून आले. पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार हांगे पुढील तपास करीत आहेत.