फलटण : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी फलटण येथे एकावर फलटण पोलिसांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गिरवी नाका येथे वाळू माफियाचा हाईवा वाहन अडवुन कारवाई करत असताना धक्काबुकी करत जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी कैलास महादेव ननावरे, वय ४४, रा. मंगळवार पेठ, झिरपे गल्ली, फलटण याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, गुरूवार दि . १६ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप आणि तलाठी हे आपले शासकीय कामासंदर्भातीस मिटींग संपवून येत असताना गिरवी नाका येथे जाधववाडीच्या बाजुने जाणाऱ्या अवैध रित्या वाळू वाहतूक करणारा हाइवा ट्रक फलटणकडे जाताना दिसला. त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्यावर शासकीय कारवाई करत असताना कैलास महादेव ननावरे हा फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करित आहेत.






















