महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा कॉलेजऐवजी कॅफेकडे वावर वाढला, प्रतितासाला पैशाच्या आकारणीतून आर्थिक लुबाडणूक
दहिवडी : दहिवडीमध्ये असलेल्या कॅफेच्या माध्यमातून अश्लीलतेला वाव मिळत असल्याची दमदार चर्चा दहिवडीभर चांगलीच रंगली आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा वावर कॉलेजऐवजी कॅफेकडे जास्त वाढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
दहिवडीत सध्या पॉकेट कॅफे, ब्लॅक ओसीयन कॅफे, क्रिस्टल कॅफे असून त्यामध्ये अश्लीलतेच्या या गोष्टी जोमाने चालत असल्याने या गोष्टी थांबवण्याची मागणी पालकवर्गाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. चहा,नाष्टा, वाढदिवस साजरे करण्याच्या उद्देशाने हे तरुण तरुणी या कॅफेमध्ये जात असतात.
या कॅफेंमध्ये या तरुण तरुणींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची सोय करून बंदिस्त बैठकव्यवस्था आहेत. तर काही कॅफेंमध्ये स्वतंत्र खोल्यांचीही व्यवस्था आहे. त्यासाठी या तरुण- तरुणींकडून प्रतितासाला सुमारे १५० रुपये एवढी रक्कम आकारत त्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. या गोष्टी थांबण्यासाठी अशा कॅफेवर बंदी आणण्याची मागणी पालक व जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
अश्लीलतेला वाव देत राजरोसपणे प्रत्येक कॅफेतून प्रतितासाने तरुण-तरुणींची आर्थिक लुबाडणूक भरदिवसा होत असताना दहिवडी पोलीस स्टेशन झोपले आहे का? पोलिसांचे या कॅफेवाल्यांशी कोणत्या प्रकारचे आर्थिक साठे-लोटे आहे काय? असे अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा यावर कोणता निर्णय घेते? कॅफेच्या माध्यमातून होणारे हे अश्लील प्रकार रोखले जाणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.