महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे आभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर झंडा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत कराड शहरातील सर्व शासकीय/ निमशासकीय/ खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी कराड नगरपरिषदेने पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त भाव धान्य दुकाने व सहकारी संस्था यांच्यासोबत सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केलेली आहे.
हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत/ पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/ खादी पासून बनविलेल्या कापडाचे राष्ट्रध्वज संस्था पदाधिकारी व नागरिकांनी स्वतः विकत घेऊन त्याची उभारणी करावी असे आवाहन कराड नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी श्री. रमाकांत डाके यांनी केलेले आहे. राष्ट्रध्वजाची उभारणी करताना भारतीय ध्वजसंहिता २००५ चे पालन करावे. जाणते- अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता संस्था पदाधिकारी व नागरिकांनी घ्यावी. स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यासाठी आपली नोंदणी कराड नगरपरिषदेमध्ये करावी. नोंदणी करणाऱ्या संस्था पदाधिकारी व नागरिकांना नगरपरिषदेकडून राष्ट्रध्वज माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल. राष्ट्रध्वज बांधणी, भारतीय ध्वज संहिता २००५ व मानवंदना यासाठी प्रशिक्षण लवकरच आयोजित केले जाणार आहे.