सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत १३ काेटी ६४ लाख ७१ हजार ८७६ रुपयांच्या चाेरीसह भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सातारा आणि पुण्यातील १८ रहिवाशांनी दाखल केलेला अटकपुर्व जामीन अर्ज नुकताच सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष म्हणजे या संशयित आराेपींपैकी काही जण कंपनीचे भागदारक तसेच कामगार आहेत.
युटाेपिया कंपनीचे प्रमुख प्रसन्न देशमुख यांनी सातारा (satara) सिटी पाेलिस ठाण्यात सुमारे दीड महिन्यांपुर्वी तक्रार दिली हाेती. फसवणुकीचा तपास सध्या सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे पाेलिस अधिकारी करीत आहेत. फिर्यादी प्रसन्न देशमुख व संशयित आराेपी महेश साखळकर हे कंपनीचे भागिदार आहेत. देशमुख यांचे ७५ टक्के शेअर्स असून साखळकर यांनी अन्य संशियत आराेपींशी संगनमत करुन कंपनीचा अधिकृत लाेगाेचे डिझाईन चाेरले. याबराेबरच कंपनीस आर्थिक ताेटा हाेईल अशा विविध गाेष्टी केल्या.
याबाबत देशमुख यांनी १४ काेटींचे नुकासन झाल्याची तक्रार पाेलिसांत दिली. संबंधित गुन्ह्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेस वर्ग झाला आहे. दरम्यान संबंधित संशयितांनी अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी सातारा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला हाेता.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या समाेर झाली. यावेळी मिलींद ओक, शिवराज धनवडे आणि राज साळूंखे या वकीलांनी केलेला युक्तीवाद न्यायाधीशांनी ग्राह्य धरला.
दरम्यान न्यायालयाने महेश साखळकर, नितीन गायकवाड, तन्मय रणशिंग, अनिरुद्ध देसाई, अभय सपाटे, तुषार कदम, समीर वाघ, नितीन चिकुर्डे, अनिकेत बाेबडे, धनंजय कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी, देवदत्त काणे, सार्थक पालकर, साै. किरण पालकर, साै. जागृती साखळकर, शुभम यादव, विकास माेरे, दिनेश फलक या १८ जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला.























