महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड:
रेल्वे कामासाठी केलेल्या जिल्ह्यातील भूसंपादनाबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. भूसंपादन रेकॉर्ड अद्यावत करताना उपलब्ध असलेल्या नकाशांची खात्री राज्याच्या संबंधित महसूल विभागामार्फत करून भूसंपादनाच्या तक्रारींचा निपटारा करावा अशी सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे विभागाला केली.
रेल्वे संदर्भात झालेल्या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती नोंदवत खा. श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यातील काही ठळक मुद्दे मांडून विविध कामांची मागणी केली. अन्य खासदारांसह मुंबई, पुणे व सोलापूर येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यां समवेत ही बैठक गुरूवारी पार पडली.
सातारा व कराड रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे कार्य देखावे व शिल्पचित्र माध्यमांतून दाखविण्यात यावेत. लोणंद येथे अंडरपास मंजूर करण्यासाठी तसा प्रस्ताव करण्यात यावा.
तसेच लोणंद रेल्वे जंक्शनवर हायमास्ट लॅम्प बसविण्याबाबत त्यांनी रेल्वे अधिका-यांना सूचना केली. तसेच जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा उपलब्ध व्हावी असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर, अहमदाबाद आणि बेंगलोर सिटी एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांना प्रयोगिक तत्वावर सातारा जिल्ह्यातील काही स्टेशनवर थांबा मंजूर करण्याची मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत केली.