पिंपोडे बु : कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपोडे बुद्रुक सारख्या खेडेगावात ३२ वर्षापूर्वी पतसंस्थांची स्थापना करुन, त्याचे संबंध महाराष्ट्रभर आर्थिक जाळे निर्माण करुन सहकाराच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार युवक कल्याण, महिला सक्षमिकीकरण याव्दारे घडविलेल्या सामाजिक परिवर्तन कार्याची दखल घेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत सहकार पँनलने बँका, पतसंस्था, नागरी बँका वर्गातून छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांना दिलेली उमेदवारी योग्य असून त्यांच्या निवडीने जिल्हा बँकेत अनुभवी, अभ्यासू संचालकाची भर पडेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. जिल्हा बँक संचालक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी कॉग्रेस पुरस्कृत सहकार पँनलचे उमेदवार रामभाऊ लेंभे यांनी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेशराव साळुंखे, अशोकराव लेंभे, जितेंद्र जगताप, करंजखोप माजी उपसरपंच संदीप धुमाळ आदी उपस्थित होते.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत नागरी सहकारी बँका व पतसंस्था मतदारसंघातून सहकार पँनलचे उमेदवार रामभाऊ लेंभे यांच्याविरोधात शिवसेना नेते शेखर गोरे समर्थक सुनिल जाधव यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यानुषंगाने रामभाऊ लेंभे यांनी मतदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. लेंभे यांचा बँकिंग क्षेञातील मोठा अनुभव असून त्यांचा मोठा संपर्क आहे. नागरी सहकारी बँक मतदारसंघासाठी एकून ३७४ मतदान असून यापैकी लेंभे यांना २५० ते ३०० मतदान होईल, असे मत जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेशराव साळुंखे यांनी व्यक्त केले.दरम्यान, यावेळी विविध बँका, पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार पँनलचे उमेदवार रामभाऊ लेंभे यांना पाठिंबा देत निवडून देण्याचे आश्वासन दिले.