पाटण : पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे १७ पैकी १५ नगरसेवक निवडून आले. त्यानिमित्ताने पाटण रामापूर भागातील प्रभाग क्र.११ सचिन किसनराव कुंभार प्रभाग, क्र. १२ मधील अनिता शशिकांत देवकांत, प्रभाग क्र. १३ मधील मिनाज फारूक मोकाशी, प्रभाग क्र. १६ मंगळ कांबळे, प्रभाग क्र. १७ उमेश वसंतराव टोळे, प्रभाग क्र. १ स्वप्नील माने या नवनिर्वाचित नगरसेवक व पाटण अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक अमजदभाई हकीम यांचा मोरेश्वर सामाजिक विकास संस्था यांच्यामार्फत सत्कार घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष विजय टोळे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये त्यांनी मोरेश्वर सामाजिक संस्थेने केलेले सामाजिक उपक्रम, पूर परिस्थितीमध्ये संस्थेने केलेले मदतकार्य याची थोडक्यात माहिती सांगितली. यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार मोरेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आला.
सत्काराला उतर देताना माजी उपनगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक सचिन कुंभार म्हणाले की, मोरेश्वर सामाजिक संस्थेचे काम आदर्शवत आहे.पाटण मध्ये कोणताही सामाजिक कार्यक्रम असो मोरेश्वर सामाजिक संस्था नेहमीच पुढे असते. मग ते शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटप असो किंवा महापुराच्या वेळी लोकांना मदत करायची असो. संस्थेच्या अध्यक्षापासून सद्स्यापर्यंत सर्वजण एकदिलाने काम करतात व पुढील काळात नगरपंचायतीच्या वतीने लागेल ती मदत मोरेश्वर सामाजिक विकास संस्थेला करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर नगरसेविका मिनाज मोकाशी यांनी आपल्या भाषणात सर्व प्रथम आपल्याला प्रभागातून भरघोस मतांनी निवडून दिल्याबदल मतदार बंधू भगिनीचे आभार मानले. तसेच आम्ही सर्व नगरसेवक मोरेश्वर सामाजिक संस्थेच्या पाठीशी आहोत. संस्थेच्या सामाजिक उपक्रमात आम्ही त्यांच्या नेहमी सोबत काम करू असे सांगितले.
मोरेश्वर संस्थेचे अध्यक्ष कय्युम हकीम यांनी आपल्या मनोगतात संस्था स्थापनेची थोडक्यात माहिती सांगितली संस्था नेहमीच वेगवेगळे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवीत असते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच भावनेतून आम्ही हे सामाजिक काम करत असतो. तसेच आमच्या कार्यक्रमास नेहमीच सभागृह उपलब्ध करून देणारे प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष शशिकांत कांबळे यांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजय टोळे यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मच्छिंद्र स्वामी,साईराज कवर, दिपक कोळी, शशिकांत देवकांत यांच्यासह श्री. मोरेश्वर सामाजिक विकास संस्थचे सर्व सदस्य व सभासद हजर होते. सदर कार्यक्रम कोरोनाचे सर्व निकष पाळून घेण्यात आला.





























