बजेट 2022 ; जाणून घ्या सर्वात महत्वाचे मुद्दे
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावेळी त्या म्हणाल्या, हा अर्थसंकल्पाचा प्रामुख्याने महिला, शेतकरी, दलित आणि तरुणांना सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच, सर्वांचे कल्याण हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असेही सीतारामन म्हणाल्या. जाणून घेऊयात निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणातील सर्वात मोठे आणि महत्वाचे 15 मुद्दे…
- मगअर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, लवकरच एलआयसीमध्ये आयपीओ आणला जाईल. याची प्रक्रिया याच आर्थिक वर्षात सुरू होईल. महत्वाचे म्हणजे, एलआयसीच्या आयपीओची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.
- आरोग्य विषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, लसीकरण कार्यक्रमाला गती देणे आणि साथीच्या रोगाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करणे, हे आमचे लक्ष्य आहे.
- आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने 60 लाख नव्या नोकऱ्या निर्माण करणे आणि पुढील पाच वर्षाच्या काळात 30 लाख इतर नोकऱ्या अथवा संधी निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल.
- अर्थसंकल्पात पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार. लॉजिस्टिकचा खर्च कमी करणार. देशाची अर्थव्यवस्था 7 इंजिनच्या सहाय्याने धावेल.
- अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्याचे काम केले जाईल. 2022-23 मध्ये 60 किमी लांबीचे रोपवे तयार केले जातील. भारतातील गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- सरकारने एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 2.37 कोटी रुपये पाठवले आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. शासनाकडून रासायनिक व कीटकनाशक मुक्त शेतीचा प्रसार करण्यावर भर दिला जाईल.
- डिजिटल विद्यापीठे तयार केली जातील आणि शाळांमध्येही प्रत्येक वर्गांत स्मार्ट टीव्ही लावला जाईल. तरुणांना स्किल इंडिया मिशनच्या माध्यमाने आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार बनविण्यासाठी काम केले जाईल.
- पीएम आवास योजनेंतर्गत 48 हजार कोटी रुपये खर्चून 80 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नव्या घरांसाठी शहरी भागांत अधिक तरतूद केली जाईल आणि ग्रामीण भागासाठीही आधुनिक घरे बांधली जातील.
- आता पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन ट्रान्सफरची सुविधाही उपलब्ध होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येईल. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 2022 पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधाही उपलब्ध होईल.
- 2022 मध्ये 5G सेवेची सुरू केली जाईल. हे तंत्रज्ञान भारतात उत्तम रोजगार निर्मिती करेल. देशातील दुर्गम भागांतही सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्व जण डिजिटल जगाशी जोडले जावे, हे आमचे लक्ष्य आहे.
- अर्थसंकल्पातील 25 टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रातील संशोधनासाठी दिली जाणार आहे. देशाच्या सीमांवरील परिस्थिती लक्षात घेत या अर्थसंकल्पात संरक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे.
- डिजिटल करन्सी लागू केली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2022-23 पासून डिजिटल चलनाची सुरू करणार आहे. यानंतर डिजिटल करन्सीचा व्यवहारात वापर होणे सुरू होईल.
- क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल. तसेच, मार्च 2023 पर्यंत स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल. NPS वर कर सवलत वाढून 14 टक्के करण्यात आली आहे.
- सौरऊर्जा निर्मितीसाठी अर्थसंकल्पात 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर दिला जाईल.
- परदेशातून येणारी यंत्रसामग्री स्वस्त होईल आणि शेतीसाठी आवश्यक असलेली उपकरणेही स्वस्त होतील. कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील. हिऱ्यांच्या दागिन्यांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. तसेच छत्र्यांवरील आयात शुल्कात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.