
तांदूळ ,कडधान्य व भाजीपाला विक्री दालने, सेंद्रिय शेतकरी गटांची शेतमाल विक्री ,महिला बचत गट उत्पादने-मसाला,पापड, लोणची इ.प्रदर्शन व विक्री तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान परिसंवाद व चर्चा सत्र ,शेतकरी उत्पादक ग्राहक परिसंवाद त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रसार ही या प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
या महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून खरीप हंगामात विविध योजनेअंतर्गत भात पीक प्रात्यक्षिकामधून उत्पादित झालेले लाल ,काळा,जांभळा भात तसेच इतर सुवासिक- इंद्रायणी,बारीक जातीच्या- वाडा कोलम ,शुभांगी वाय एस आर इ.तांदळाची थेट शेतकऱ्यांकडून योग्य दरात ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रब्बी हंगामात उत्पादित कडधान्य तसेच भाजीपालाही थेट शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे .रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेले विविध जातींचे तांदूळ, भाजीपाला, कंदमुळे ,कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत .विविध महिला बचत गटांची उत्पादने व त्यांचे प्रदर्शनही ग्राहकांसाठी या महोत्सवात प्रमुख आकर्षण असणार आहे. या महोत्सवात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विविध परिसंवादाचे आयोजन करण्यात आले .
तरी पनवेल शहर व परिसरातील सर्व ग्राहक तसेच शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन -कृषी विभागामार्फत आयोजित महोत्सवात सहभागी होऊन विकेल ते पिकेल-थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना साखळी विकसित करावी व जास्तीत जास्त शेतकरी उत्पादनांची खरेदी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.






















