सातारा : कोरोनामुळे दोन महिन्यांपासून वासोटा किल्ल्यावरील पर्यटन बंद होते. त्यामुळे बामणोली परिसरातील बोटमालक, चालक व अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक (वन्यजीव) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोट्यावरील पर्यटन, बोटिंग तातडीने पुन्हा सुरू करण्याची सूचना सोमवारी केली. त्यांनतर चव्हाण यांनी आज मंगळवार दि. 1 फेब्रुवारी पासून वासोट्यावरील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
बामणोलीतील भैरवनाथ बोट क्लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, उपाध्यक्ष संजय शिंदकर, सचिव नीलेश शिंदे, सुभाष शिंदकर, राजेंद्र संकपाळ, राजेंद्र कांबळे, गोविंद शिंदकर, किसन भोसले, पदाधिकारी व सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन पर्यटन व बोटिंग सुरू करण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनसंरक्षक (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) समाधान चव्हाण यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला.
बामणोली भागातील बोटिंग व इतर व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. करोनाचा प्रादुर्भाव असूनही महाबळेश्वरमध्ये पर्यटन सुरु आहे. इतर ठिकाणीही सर्व व्यवसाय सुरू असताना, वासोट्यावरील पर्यटन बंद ठेवल्याने बामणोली परिसरातील बोटचालक, मालक व इतर व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पर्यटनाची परवानगी त्वरित द्यावी, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.त्यानंतर चव्हाण यांनी मंगळवारपासून पर्यटन सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही संपर्क साधला. वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू होत असून महसूल विभागाने व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. शेखर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वासोट्यावरील पर्यटन आणि बोटिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल बोट क्लबच्या सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.