छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे- डॉ. अतुल भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबत परकीय आक्रमणांना परतवून लावत रयतेचे संरक्षण केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या राज्यकारभारात स्थान दिले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी केले.
य. मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, जे.डी.मोरे, संभाजीराव पाटील, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, प्राचार्य डॉ.भास्करराव जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अतुल भोसले पुढे म्हणाले, शिवरायांनी मूठभर मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केले. आपल्या राज्यात शेती संदर्भात व व्यापारवाढीचे निर्णय घेतले. तसेच प्रजेच्या न्यायासंदर्भात चांगले धोरण राबविले. शिवराय शूर योद्धे होते त्याबरोबरच उत्तम प्रशासकही होते. शिवरायांचे विचार युवा पिढीने आत्मसात करावेत. असे आवाहन डॉ. अतुल भोसले यांनी केले.
प्रारंभी मच्छिंद्रगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन व महाविद्यालयातील वाय- फाय सुविधेचा शुभारंभ डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणात असणाऱ्या शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यास डॉ. अतुल भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान कारखाना कार्यस्थळावर उपाध्यक्ष जगदीश जगताप यांच्याहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, एम के कापूरकर, सेक्रेटरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर टेक्निकल पी.डी.राक्षे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य डॉ.भास्करराव जाधव यांनी केले. संकेत कानुगडे याने मनोगत व्यक्त केले. स्नेहल दबडे, संतोष गोरे यांनी सूत्रसंचालन केले. निखिल गायकवाड याने आभार मानले.