महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तर गेल्यावर्षी सततच्या व धुवांधार पावसामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. त्यानंतरही पाऊस होत राहिल्याने पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी झाली नाही.
परिणामी यावर्षी उन्हाळ्यातही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा टिकून राहिला होता. त्यातच यावर्षी जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरूवात झाली.
काही दिवस धुवांधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला.
परिणामी धरणे भरणार का? अशी चिंताही निर्माण झाली होती. आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरूवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवांधार पाऊस पडला.
यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.
जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्य:स्थितीत या धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
म्हणजे धरणे भरण्यासाठी फक्त २ टीएमसी पाण्याची आवश्यता आहे. त्यातच या धरण परिसरातही सध्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची हळू हळू आवक होत असून धरणे भरल्यातच जमा आहेत.
दरम्यान, सद्य:स्थितीत धोम धरणातून बोगद्याद्वारे १५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कण्हेरच्या पॉवर हाऊसमधून नदीला ५७४ तर उरमोडी धरणातून नदीला २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणातही १.१५ टीएमसी पाणीसाठा झाला असून १०० टक्के भरले आहे. सध्या या धरणातून १५६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)
धरणे यावर्षी टक्केवारी एकूण क्षमता
- धोम १३.२८ ९८.३८ १३.५०
- कण्हेर ९.९२ ९८.१७ १०.१०
- कोयना १०३.९६ ९८.७७ १०५.२५
- बलकवडी ३.९० ९५.५९ ४.०८
- उरमोडी ९.८५ ९८.८८ ९.९६
- तारळी ५.८३ ९९.६४ ५.८५